पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रेल्वे रुळाला तडे
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 03 Mar 2017 10:30 AM (IST)
मुंबई: रुळाला तडे गेल्यामुळे विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू ट्रॅकवर येत आहे. रुळ दुरुस्त करुन वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे. सकाळच्या वेळीच रुळाला तडे गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. गोरेगाव- मालाड दरम्यान रेल्वेरुळाला तडे गेल्यानं वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे चर्चगेटवरून बोरिवलीकडे जाणारी वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशिराने धावत आहे. त्याशिवाय बोरिवली स्टेशनवरून लोकल सुटत नसल्यानं स्टेशनवर मोठी गर्दी झाली. कार्यालयीन वेळेतच वाहतूक रखडल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. बोरिवली स्टेशनवरच लोकल रखडल्याने त्यापुढील प्रत्येक स्टेशनवर त्याचा ताण पडत आहे. परिणामी चर्चगेटच्या दिशेने सर्व स्टेशनवर गर्दी वाढत आहे.