मुंबई: 12वी मराठीची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याआधीच काही काळ फुटल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा सुरु होण्याआधी 5 मिनिटं आधीच मराठीचा पेपर सोशल मीडियावर लीक झाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात बोर्डाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.


दरम्यान, सायबर क्राईम सेलकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय सचिव दत्तात्रय जगताप यांनी दिली.

सोशल मीडियावरुन अशा पद्धतीनं पेपर लीक होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी 2015 आणि 2016 मध्येही अशाच प्रकारे 12वीचे पेपर लीक झाले होते. यंदा देखील अशाच पद्धतीनं पेपर लीक झाल्यानं खळबळ उडाली आहे.

काल मराठीचा पेपर 11 वाजता सुरु होणार होता. मात्र, विद्यार्थांना 10.30 वाजताच वर्गात सोडण्यात आलं होतं. त्यानंतर 10.50 वा. त्यांना पेपर हातात देण्यात आला. त्यामुळे पेपर नक्की कोणी लीक केला याबाबत सध्या बोर्डही साशंक आहे. कारण की, त्याआधी पेपर सुपरवायझर हाताळतात. त्यामुळे पेपर कुणाकडून लीक झाला याबाबत सध्या संभ्रम आहे.

पेपर अवघ्या काही मिनिटांपूर्वी लीक झाल्यानं तो पुन्हा घेण्यात येणार की नाही याबाबत बोर्डानं अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, याआधी दोनदा अशाच पद्धतीनं पेपर लीक झाला होता. त्याची तक्रार पोलिसातही देण्यात आली होती. मात्र, त्याचे आरोपी अद्यापही सापडलेले नाहीत.