मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मध्यरात्री बंद राहणार ही अफवा
एबीपी माझा वेब टीम | 07 May 2017 07:37 PM (IST)
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : मेट्रो-7 च्या कामासाठी मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे अर्थात पश्चिम द्रुतगती महामार्ग मध्यरात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत बंद राहिल, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही अफवा असल्याचं स्पष्टीकरण एमएमआरडीएकडून देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर दिशाभूल करणारे आणि संभ्रम निर्माण करणारे अनेक मेसेज व्हायरल होतात. या अशाच एका मेसेजमुळे मुंबईकरांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर मेट्रो-7 प्रकल्पाचं काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच या कामासाठी पुढील काही दिवस मध्यरात्री ते पहाटे 5 पर्यंत हा द्रुतगती महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात येणार असल्याचा मेसेज व्हायरल झाल्यामुळे मुंबईकरांमध्ये गोंधळ उडाला होता.