मुंबई : मानव संसाधन विकास मंत्रालयकडून शाळांच्या दप्तरांच्या ओझ्याबाबत आता पुन्हा एकदा सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या नियमावलीनुसार इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना कोणताही गृहपाठ दिला जाणार नसल्याचं नियमावलीत सांगण्यात आलं आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे नेमके किती असावे, याबाबत सुद्धा नियमावली यामध्ये तयार करण्यात आली आहे.


ही नियमावली देशातील सर्व राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना लागू असणार आहे. त्यामुळे पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आता गृहपाठ दिला जाणार नाही. शिवाय पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयाशिवाय कोणतेही इतर विषय अभ्यासाला ठेवू शकणार नाही. तर इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी भाषा, गणित आणि पर्यावरण विषयाशिवाय अन्य कोणतेही विषय अभ्यासले जाणार नाहीत.


विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त पुस्तक, वस्तू आणण्यास सांगितले जाणार नाही. ज्यामुळे दप्तराचे ओझे ठरवलेल्या मर्यादेपेक्षा वाढेल.


या नव्या नियमावली नुसार इयत्ता पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे दीड किलो पेक्षा जास्त नसावे. इयत्ता तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हे 2 ते 3 किलोपर्यंत असावे, असे नमूद करण्यात आले आहे.


इयत्ता सहावी आणि सातवी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे 4 किलोपर्यंत असावे. आठवी आणि नववी विद्यार्थ्यांचे ओझे हे साडेचार किलोपर्यंत, तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे ओझे पाच किलोपर्यंत असावे असे निर्देश आहेत.