Maharashtra Political Crisis : कोर्टावर आमचा विश्वास आहे. 12 जुलै रोजी आम्हाला दिलासा देणारा निर्णय येईल, असा विश्वास शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी व्यक्त केला. कोर्टात पुढचं उत्तर काय असेल या अनुषंगाने कायदेतज्ज्ञ रणनीती आखत आहेत, असं अजय चौधरी यांनी सांगितलं. एबीपी माझासोबत साधलेल्या संवादात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश, शिंदे गटाचं संख्याबळ, दीपक केसरकर आणि आमदारांच्या घरांवरील हल्ल्याच्या वृत्तावर भाष्य केलं.


16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. महाराष्ट्रातील  या राजकीय सत्तासंघर्षात आज सुप्रीम कोर्टानं महत्वाचे निर्देश दिले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस देण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. 


बंड केल्यानंतर शिवसेनेने कारवाई करत एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी करत शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेंच गटनेते असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. अशातच आता शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या नियुक्तीला मान्यता दिली.


वेळ येईल तेव्हा पाहू कोणाचं संख्याबळ जास्त
सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर अजय चौधरी यांच्यासोबत साधलेल्या संवादात म्हणाले की, शिंदे गटाकडून आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे असं सांगितलं जात आहे. विधानमंडळ हे संख्याबळ दाखवण्याची जागा आहे, असं माझं म्हणणं आहे. ती वेळ येईल त्यावेळी पाहू नेमकं कुणाचं संख्याबळ जास्त आहे.


'शिवसेना काय हे अजय चौधरींनी सांगू नये'
दीपक केसकर कुठून आले आहेत त्यांनी हे पाहावं. शिवसेना काय हे त्यांनी आम्हाला हे सांगू नये. मी आठवीत असल्यापासून शिवसेनेत आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत शिवसेना चालवत आहेत. त्यांनी शिवसेना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे, असंही अजय चौधरी यांनी म्हटलं. 


बंडखोर आमदारांकडून भावनिक वातावरण निर्माण करण्याचं काम
दरम्यान राजकीय आकसापोटी बंडखोरी केलेल्या आमदारांची सुरक्षा काढण्यात आली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं म्हटलं. आतापर्यंत कोणत्याही आमदाराच्या घरावर हल्ले झालेले नाहीत. केवळ भावनिक वातावरण निर्माण करण्याचं काम बंडखोर आमदार करत आहेत, असा दावा अजय चौधरी यांनी केला.