Mumbai: पाणी पुरवठ्याबाबत मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई शहरात काही ठिकाणी दोन दिवस पाणीपुरवठा बंद (Mumbai Water Supply) राहणार आहे. 30 आणि 31 जानेवारीला मुंबईतील काही भागात पाणी कपात (Water Cut In Mumbai) करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई पालिकेकडून माहिती देण्यात आली आहे. भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर 2 ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि 2 ठिकाणी उद्भवलेली गळती करण्यासाठी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार राहणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
Water Supply To Be Disrupted In Parts Of Mumbai: महानगरपालिकेच्या 24 विभागांपैकी 12 विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीच्या कामांसाठी 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांपैकी 12 विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. तर 2 विभागातील पाणीपुरवठ्यात 25 टक्के कपात करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेच्या जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी माहिती दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना माळवदे यांनी सांगितले की, पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या 9 विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की, याशिवाय 'जी उत्तर' आणि 'जी दक्षिण' या 2 विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात 30 व 31 जानेवारी 2023 रोजी 25 टक्के कपात करण्यात येणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी 4 ते सायंकाळी 9 या दरम्यान पाणीपुरवठा होतो. त्या भागात 30 जानेवारी 2023 रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.