Mumbai Coronavirus cases : मुंबईकरांसाठी पॉझिटिव्ह बातमी समोर आली आहे. तब्बल 34 महिन्यानंतर शहरात शून्य कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 16 मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. दोन वर्षापूर्वी मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांचा स्फोट झाला होता, त्यामुळे राज्याच्या चिंतेत वाढ झाली होती. धारावी, दादर, कुर्ला या गर्दीच्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. पण आज मुंबई शहरात एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. मुंबईसाठी पॉझिटिव्ह बातमी आहे.
मुंबईत किती सक्रिय रुग्ण?
मुंबईमध्ये आज एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. ही दिलासादायक बातमी आहे. पण मुंबईत सध्या 23 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 1154317 इतक्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1134547 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 19747 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई पालिकेला यश -
मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बाधित रुग्ण संख्या 21 हजारांच्या घरात पोहोचली होती, तर कोरोनामुळे रोज मृत्यू होण्याची संख्या 100 च्या घरात पोहोचली होती. मात्र राज्य सरकार व मुंबई महापालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत धडकलेल्या कोरोनाच्या तिन्ही लाटा परतवण्यात पालिका यश आले. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा उसळल्या असून ओमायक्राॅन बीएफ 7, एक्सबीबी, एक्सबीबी 1.5 असे नवनवीन व्हेरिएंटचा शिरकाव मुंबईत झाला. मात्र पालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे.
आज कुठे रुग्ण आढळले?
राज्यात आज आठ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. केडीएमसी, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, जालना आणि वाशिम येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. तर नाशिक मनपामध्ये आज दोन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात इतर ठिकाणी एकाही कोरोना रुग्णांची नोंद नाही.
राज्यात किती सक्रिय रुग्ण?
महाराष्ट्र आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 110 सक्रिय रुग्ण आहेत. आज राज्यात आठ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा आहे. आज 15 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 79,88,545 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.17 % एवढे झाले आहे.
भारतातली लसीकरण किती?
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.30 कोटी लस मात्रा ( 95.16 कोटी दुसरी मात्रा आणि 22.57 कोटी वर्धक मात्रा रुपात) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 2,18,324 लस मात्रा देण्यात आल्या. भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,931 आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.01% आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.81% आहे. गेल्या 24 तासात 90 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 4,41,49,436 वर पोचली.
गेल्या 24 तासात 89 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एकूण 91.45 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,61,679 चाचण्या करण्यात आल्या. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.06 % इतका आहे. तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.08% इतका आहे.