मुंबई : महाराष्ट्राला येत्या काळात मोठ्या पाणीटंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील धरणांमध्ये फक्त 7.7 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. तर मराठवाड्यातल्या धरणांमध्ये केवळ 0. 7 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.


गेल्यावर्षी यावेळी राज्यातील धरणांमध्ये 18 टक्के पाणीसाठी शिल्लक होता, तर मराठवाड्यात 14 टक्के पाणीसाठी होता. अद्याप मान्सून केळरमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत शिल्लक पाणीसाठ्यातील पाणी पुरवण्याचं मोठं आव्हान असणार आहे.


Loadshedding Drought | उस्मानाबादमधील रहिवाशांना दुष्काळाच्या जोडीला भारनियमनाचे चटके | ABP Majha


गेल्यावर्षी राज्यात केवळ 76 टक्के साधारण पाऊस झाला होता. त्यामुळे राज्यातील 42 टक्के भागात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. राज्यातील 60 टक्के शेतकऱ्यांना या दुष्काळाची झळ बसत आहे. मराठवाड्यात पाणी टंचाईची स्थिती सर्वात भीषण आहे.


उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर तेथील धरणांमध्ये 6.4 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये 7.8 टक्के पाणीसाठी आहे. विदर्भातील नागपूर विभागातील धरणांमध्ये 6.2 टक्के तर अमरावती विभागातील धरणांमध्ये 7 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.


सध्या राज्यात 1583 चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये जवळपास 10 लाख 68 हजार जनावरे आहेत. राज्यात 17 ते 21 जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्यात विविध ठिकाणी 6443 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.