भिवंडीत धोकादायक इमारतीची भिंत कोसळली, आपत्ती व्यवस्थापन कक्ष अनभिज्ञ
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2017 11:20 PM (IST)
भिवंडी : शहरालगतच्या लोणी खाडीपार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या घटनेबाबत तहसीलदार कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष अनभिज्ञ होतं. भिवंडीत रात्री झालेल्या पावसानं या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील काही भाग आणि भिंत कोसळली. तळमजल्यावरील दुकानं बंद असल्यानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ही घटना घडल्यानंतर तीन तास उलटले, तरी तहसीलदार कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षास याबाबत माहिती नव्हती. अशा परिस्थितीत इमारत कोसळल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.