विरार (ठाणे) : विरारमधील अर्नाळा समुद्रकिनारी असलेल्या प्राचीन मंदिराशेजारी अश्लिल डान्सचा प्रकार समोर आला आहे. उत्तर भारतीय मित्र मंडळाद्वारे मकर संक्रातीनिमित्त भोजपुरी रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अर्नाळा समुद्रकिनारी वैतरणेश्वर महादेव हे प्राचिन मंदिर आहे. या मंदिराशेजारी उत्तर भारतीय मित्र मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात काही मुली अश्लिल हावभाव करत नाचत होत्या. धक्कादायक म्हणजे या तरुणींवर पैसेही उडवले जात होते. या सर्व आक्षेपार्ह प्रकाराची व्हिडीओ क्लिप मोबाईलवरुन व्हायरल होत आहे.
आणखी धक्कादायक म्हणजे, हा अश्लिल नाच-गाण्याचा कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत सुरुच होता. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याची या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे राऊंडला असणाऱ्या एकाही पोलिसाने त्यांना हटकलं नाही. तर या कार्यक्रमाला काही राजकीय पुढाऱ्यांनीही हजेरी लावली होती.