मुंबईतील मराठा मोर्चाची तारीख बदलली!
एबीपी माझा वेब टीम | 15 Jan 2017 06:38 PM (IST)
मुंबई : 31 जानेवारीऐवजी 6 मार्चला मुंबईत मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. मराठा मोर्चासंदर्भात राज्यातील विविध जिल्ह्यातील संयोजकांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या तारखेचा अंतिम निर्णय घेण्यात आला. 31 जानेवारीला राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतला मराठा मोर्चा पुढे ढकलण्याबाबत या बैठकीत सूर उमटले होते. औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधी 31 जानेवारीला मुंबईत मोर्चा काढण्यावर ठाम होते. मात्र, आता मतभेद दूर झाले असून, 6 मार्चला मराठा क्रांती मोर्चाचं मुंबईत आयोजन करण्यावर सर्वांचं एकमत झालं आहे. मराठा मोर्चाची आगामी वाटचाल, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चाची बांधणी आणि मुंबईतील मोर्चासंदर्भात आजच्या बैठकीचं नियोजन करण्यात आले होते. या बैठतीत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मराठा मोर्चाचे संयोजक उपस्थित होते.