मिरा भाईंदर : महापालिकेची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असताना काँग्रेसने खळबळजनक आरोप केला आहे. मिरा भाईंदर निवडणुकीतील मतदार यादीत घोळ असून भाजप खोट्या मतदारांच्या जीवावर सत्ता आणणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
मिरा भाईंदरमध्ये प्रभाग क्रमांक 10 आणि 12 मध्ये मतदार यादीत हजारो नावे पुन्हा पुन्हा आहेत. सत्ताधारी पक्षाने प्रत्येक वार्डमध्ये हजारो मतदारांची नावे दोन ते तीन वेळा मतदान यादीत समाविष्ट केली असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
निवडणूक आयोगाकडे तक्रार करून काँग्रेसने कारवाईची मागणी केली आहे. मिरा भाईंदरच्या वार्ड क्रमांक 10 मध्ये 1500 तर वार्ड क्रमांक 12 मध्ये 1600 अशी नावे आहेत, जी मतदान यादीत 2 ते 3 वेळा आली आहेत. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोग, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना खोट्या मतदारांची यादी सोपवली आहे.
सत्ताधारी पक्षाने आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी हे षडयंत्र रचलं असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसच्या 10 आणि 12 वार्ड मधील उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.