Crime News: प्रेयसीला फिरवण्यासाठी मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून, आरोपीकडून तीन गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. हर्ष थापा (20 वर्ष) असे मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीचे नाव असून, तो उल्हासनगर परिसरात राहणारा आहे.
दिनेश खैरे हे बिल्डर संजय वासवानी यांच्याकडे सुपरवायझरचे काम करतात. वासवानी यांनी खैरे यांना ये जा करण्यासाठी मोटरसायकल दिली होती. खैरे हे जुन्या महाराष्ट्र बँकेजवळील हंसधाम सोसायटीत राहत असून, त्यांनी 30 एप्रिलला रात्री दहा वाजता पार्किंगमध्ये मोटरसायकल उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खैरे पार्किंगमध्ये गेले असता मोटरसायकल गायब झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, पोलिसांनी पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक तरुण मोटरसायकल काढत असल्याचे उघड झाले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांच्या टीमने या चोराचा मागोवा घेतला असता उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळील सप्तश्रृंगी अपार्टमेंट सोसायटीमधील वॉचमनचा मुलगा हर्ष थापा याने ही मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. हर्ष हा सुरुवातीला पोलिसांना तपासात सहकार्य करत नव्हता. मात्र, पोलिसांनी खाकी दाखवत त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, लव्हस्टोरीमधील प्रेमिकेला फिरवण्यासाठी तीन मोटारसायकली चोरल्याचे त्याने कबुल केले. दरम्यान पोलिसांनी त्या तिन्ही गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: