मुंबई : तुमचं जातप्रमाणपत्र रद्द का करू? असा सवाल जातपडताळणी समितीने समीर वानखेडेंना विचारला आहे. मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंचे जातप्रमाणपत्रक हे खोटं असल्याचा आरोप करत नवाब मलिक यांनी एक याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या जातपडताळणी आयोगाने हा सवाल विचारला आहे.
समीर वानखेडे यांनी जातप्रमाणपत्राच्या मुद्यावर तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर जातपडताळणी समितीतर्फे वानखेडे यांना कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रकावर आक्षेप घेतला होता. या प्रकरणी त्यांनी तक्रार करत समीर वानखेडेंचे प्रमाणपत्रक हे खोटं असल्याचा आरोप केला होता. मलिकांच्या तक्रारीवर 29 एप्रिल रोजी जातपडताळणी समितीनं समीर वानखेडेंना नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता तुमचं जातप्रमाणपत्र रद्द का करू? असा सवाल जातपडताळणी समितीने समीर वानखेडेंना विचारला आहे.
समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप याआधी करण्यात येत होता. त्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना जात पडताळणी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. भीम आर्मी आणि युथ रिपब्लिकन या संघटनांनी ही तक्रार दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप सुरू होते. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचे सांगत नोकरी मिळवली, वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे ही नोकरी मिळवली असल्याचा आरोप मलिक यांनी याआधी केला होता. तर, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावत मुस्लिम नसून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचा दावा केला आहे. या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने या वादात उडी घेतली. या दोन्ही संघटनांना मुंबई शहर जिल्हा जात पडताळणी समितीकडे वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
वानखेडे यांनी अनुसूचित जातीचा खोटा दाखला मिळवून त्या आधारावर सरकारी नोकरी मिळवली असल्याचे वृत्तांमधून समोर आले आहे. त्यामुळे वानखेडे यांची चौकशी करावी आणि त्यांचा दावा खोटा असल्यास तो रद्द करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दोन्ही संघटनांनी केली आहे.