विरार : विरारमध्ये एका शिक्षिकेवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. लिव्ह अँड रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या शिक्षिकेच्या आईच्या प्रियकराने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे विरार पोलिसांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा शिक्षिकेने केला आहे.


21 वर्षीय शिल्पा गोंड विरारच्या एका शाळेत शिक्षिका आहे. शिल्पाची आई दहा वर्षापासून विरारमधील भाताणे भागात राहणाऱ्या गुरुनाथ वारणासोबत लिव्ह अँण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होती. मात्र मागील चार वर्षांपासून त्याने शिल्पाची आई गीता यांना सोडून दुसऱ्याच महिलेसोबत संबंध ठेवण्यास सुरुवात केली. तरीही तो गीता यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असे.

गीता यांना मारहाण होता शिल्पा नेहमी मध्ये पडून आईला वाचवायची. याच रागातून 24 फेब्रुवारीला आरोपी गुरुनाथ वारणा खिडकीतून घरात घुसला. झोपलेल्या शिल्पाच्या गळ्यावर त्याने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. शिल्पाचा हात गळ्यावर असल्यामुळे वार शिल्पाच्या हातावर बसला.

त्यानंतर आरोपीने शिल्पाच्या छातीवरही वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर विरारच्या चिरायु हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

आरोपी गुरुनाथ वारणा हा स्थानिक राजकीय पुढाऱ्याचा नातेवाईक आहे. शिल्पा आणि तिच्या आईने यापूर्वीही पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. 20 फेब्रुवारीलाही गुरुनाथ वारणाने भर रस्त्यात शिल्पा, गीता, शिल्पाचे आजोबा आणि मावशी यांना मारहाण केली होती. मात्र पोलिसांनी घरगुती प्रकरण असल्याचं सांगत मायलेकीला पोलिस ठाण्यातून हाकलून लावलं होतं.

चाकूचे वार करुन जीवे ठार मारण्याचा आरोपीचा हेतू असताना विरार पोलिसांनी कलम 324 आणि 452 अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. अडचणीत आलेल्या पोलिसांनी याप्रकरणी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.