विरार : आजवर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक जणांचे जीव गेले आहेत. मात्र विरारमध्ये चक्क रस्त्यावरील खड्डयामुळे एका हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावताना खड्ड्यात बाईक पडल्यानंतर हा बनाव उघडकीस आला.
पोटगीची रक्कम वाचवण्यासाठी एका रेल्वे कर्मचाऱ्याने घटस्फोटित पत्नीची हत्या करण्यासाठी अडीच लाखांची सुपारी दिली होती. महिलेला मारल्यानंतर मारेकरी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात होते. त्यावेळी रस्त्यावरच्या खड्डयात बाईक घसरली आणि हा संपूर्ण बनाव गावकऱ्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणला.
विरार पूर्वेकडील करजोण या गावातील बोदणपाडा येथे रस्त्यावर एका 54 वर्षीय महिलेचा मृतदेह विरार पोलिसांना सापडला. रात्रीच्या अंधारात पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवून सात आरोपींना अटक केली. मयत रमाबाई नामदेव पाटील ही विरारच्या नारंगीपाडा येथील रहिवाशी होती. तिचा पती नामदेव पाटील यानं दुसरं लग्न केलं होतं.
घटस्फोटाची केस सुरु असताना रमाबाई पोटगीची रक्कम नामदेवकडे मागत होती. नामदेव रेल्वेत कर्मचारी आहे. पोटगीची रक्कम द्यायला लागू नये म्हणून, रमाबाईला ठार मारण्यासाठी करजोण गावाच्या पुढे राहणाऱ्या चंद्रकात पडवळेला त्याने अडीच लाखांची सुपारी दिली. पडवळेने या कटात एका महिलेसह आणखीन पाच जणांना सामील केलं.
आरोपी वंदना पवारने 9 सप्टेंबरला रमाबाईला काम देण्याच्या बाहण्याने करजोण येथील एका फार्म हाऊसला बोलावलं. तिला रात्रीच्या वेळी गावठी कोंबडा कापून, चांगलं खाऊ-पिऊ घातलं आणि शेवटी तिचा नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून खून केला.
अंधार झाल्यावर आरोपींनी मयत रमाबाईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं. दोघांनी मृत रमाबाईला बाईकवर मध्ये बसवून मृतदेहाची विल्हेवाट लावायला निघाले. मात्र तेवढ्यात बादणपाडा येथे रस्ता खराब असल्याने बाईकवरुन तिघेही पडले. कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने शेजारील गावकरी बाहेर आले. त्यामुळे दोघांनी मृतदेह तसाच टाकून पोबारा केला.
गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पती नामदेव पाटीलसह चंद्रकांत पडवळे, पांडुरंग कदम, लक्ष्मण कोबाड, लक्ष्मण पवार, राकेश पवार, वंदना पवार या सात जणांना अटक केली.
रस्त्यावरील खड्ड्यामुळे विरारमधील महिलेच्या हत्येचा उलगडा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2017 08:33 PM (IST)
महिलेला मारल्यानंतर मारेकरी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात होते. त्यावेळी रस्त्यावरच्या खड्डयात बाईक घसरली आणि हा संपूर्ण बनाव गावकऱ्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -