रायन इंटरनॅशनलच्या संचालकांना मुंबई हायकोर्टाचा अंतरिम दिलासा
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 12 Sep 2017 05:45 PM (IST)
काही तांत्रिक अडचणींमुळे रायन पिंटो यांच्या नावाचा अटकपूर्व जामीन उशिरानं दाखल झाला. मात्र प्रकरण एकच असल्यानं हा दिलासा संपूर्ण पिंटो कुटुंबासाठी लागू होईल असं हायकोर्टानं स्पष्ट केलं.
मुंबई : रायन इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ऑगस्टीन पिंटो, त्यांच्या पत्नी आणि व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांच्यासह मुलगा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रायन पिंटो यांना मुंबई हायकोर्टानं तात्पुरता दिलासा दिला आहे. पिंटो कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी पिंटो कुटुंबीयांना बुधवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे रायन पिंटो यांच्या नावाचा अटकपूर्व जामीन उशिरानं दाखल झाला. मात्र प्रकरण एकच असल्यानं हा दिलासा संपूर्ण पिंटो कुटुंबासाठी लागू होईल असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीतील एका मुलाचा निर्दयपणे खून करण्यात आला. हत्येआधी या मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली अटकेत असलेल्या आरोपीनं दिली आहे. या प्रकरणी गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.