विरार : स्वस्तात विरारमध्ये घर घेऊन देतो अशी बतावणी करून एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचे पैसे न देणऱ्या एका इस्टेट एजन्टला मनसे नेत्यांनी काल मारहाण केली. मारहाण करताना त्याचे फेसबुक लाईव्हदेखील केले. या घटनेनंतर त्या इस्टेट एजन्टशी संपर्क झालेला नाही. तसेच याप्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दाखल केलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


काल रात्रीपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका इस्टेट एजंटला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरार पूर्वेच्या एका इस्टेट एजन्टने एका कॅंन्सर पेशंटचे पैसे घेऊन, त्याची फसवणूक केली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्टाईलने त्याला चोप दिला.

विरार पूर्व येथे चांगल्या किंमतीत जागा घेऊन देण्याचे आमिष दाखवून राजू शेट्टी या इस्टेट एजन्टने 65 वर्षीय कॅन्सर पीडित बळवंत सुर्यवंशी यांच्याकडून 2013 साली 17 लाख रुपये घेतले होते. सुर्यवंशी हे 2008 पासून कर्करोगाने ग्रासले आहेत. तेव्हापासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. 17 लाख घेऊनही शेट्टी हा सुर्यवंशी यांना घर देत नव्हता. त्यामुळे सुर्यवंशीनी मनसेच्या वाहतुक सेनेचे अध्यक्ष नितीन नांदगावकर यांच्या जनता दरबारात याची तक्रार केली.

सुर्यवंशी यांनी तक्रार केल्यानंतर नांदगांवकर यांनी ही तक्रार फेसबुकवर शेअर केली. सोशल मीडियावर नांदगांवकरांची कैफियत समोर आल्यावर राजू शेट्टी याने विरार येथील गोकुल टाउनशीप येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख गणेश बंगेरा यांच्याशी संपर्क साधला, गणेशने आपले मित्र शाखाप्रमुख विवेक पवार यांच्याशी संपर्क साधून, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला व समन्वयासाठी आपल्या कार्यालयात बोलावून घेतले.

मंगळवारी सायंकाळी राजू शेट्टी गणेश बंगेराच्या कार्यालयात असताना मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव तेथे आले. राजू शेट्टी याने त्यांना सुर्यवंशी यांच्या 16 लाख 50 हजार रुपयांचा चेक दिला. परंतु मनसेने बंगेरांच्या कार्यालयातच राजू शेट्टीला चोप दिला आणि त्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला.

राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध होवू शकले नाहीत. त्यांचा फोनही लागत नाही. अविनाश जाधवांनी ज्या बियर शॉपीचा उल्लेख केला आहे. ती बियर शॉपी तो भाड्याने चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर तेथील मॅनेजरने एबीपी माझाशी बोलताना शेट्टीने सुर्यवंशीचे पैसे घेतल्याचे कबूल केले आहे. तसेच शेट्टी सुर्यवंशी यांचे पैसे देणार होता असेही सांगितले आहे.