विरार : मुंबईजवळच्या विरारमधील अमित झा आत्महत्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख, सामाजिक कार्यकर्ता मुनाफ बलोच, मिथिलेश झा आणि अमर झा यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

पालघर पोलिसांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप अमित झाने मृत्यूपूर्वीच्या व्हिडीओमध्ये केला होता.  या प्रकरणी मध्यरात्री दोन वाजता चार जणांवर अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अमित झाच्या शवविच्छेदननंतर त्याचा मृतदेह विरारमधील त्याच्या घरी आणला. पण संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंतसंस्कार करणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांना घेतला. अखेर मध्यरात्री 2 वाजता चार जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर, पहाटे चारच्या सुमारास अमित झावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काय आहे प्रकरण?
10 नोव्हेंबर 2017 रोजी विकास झा या तरुणाने वसईच्या उपविभागीय कार्यालयात केरोसीन ओतून जाळून घेतलं होतं. पोलिसांच्या त्रासाला आणि सामाजिक कार्यकर्ते मुनाफ बलोच यांच्या मानसिक जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विकासच्या कुटुंबीयांनी केला होता.

विकास झाच्या आत्महत्येला अडीच महिन्याचा कालावधी उलटला असतानाच त्याचा धाकटा भाऊ अमित झाने विषप्राशन करुन आयुष्य संपवलं. आपल्या भावाला न्याय मिळावा म्हणून विकासचा धाकटा भाऊ अमित झा गेल्या अडीच महिन्यांपासून पोलिसांकडे हेलपाटे घालत होता. पण पालघर पोलिस भावाला न्याय देत नसून उलट चौकशीच्या नावाखाली मानसिक त्रास देतात, असा आरोप करत अमित झा यानेही औषध प्यायलं.

संबंधित बातमी

भावाच्या आत्महत्येनंतर अडीच महिन्याने धाकट्या भावानेही आयुष्य संपवलं