मुंबई : एलएलएमच्या विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या पहिल्या सत्राच्या परीक्षेला गैरहजर राहणाऱ्यांना नापास करू नका, पुढच्या सत्रात त्यांची पुन्हा परीक्षा घ्या. असे स्पष्ट निर्देश हायकोर्टानं मुंबई विद्यापीठाला दिले आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.


यंदा ऑनलाईन निकालात उडालेल्या गोंधळामुळे एलएलएमचे प्रवेश उशीराने झाले. यंदाच्या एलएलएमच्या अभ्यासक्रमाला मुंबई विद्यापीठात ६६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ज्यातील ६०० जणांना ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये दाखला मिळाला. ४१ जणांना डिसेंबरमध्ये तर १९ जणांना १५ जानेवारीनंतर दाखला मिळाला. त्यामुळे मंगळवार २३ जानेवारीपासून सुरु होणारी ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी करत उशिरा दाखला मिळालेल्या काही विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

विद्यापीठानं या मागणीला विरोध करत, परीक्षा रद्द न करण्याची विनंती हायकोर्टात करण्यात आली होती. सरसकट सर्व विद्यार्थ्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली नसल्यानं ज्यांची तयार झाली आहे ते परीक्षेला बसू शकतात. ज्यांची तयारी झाली नसल्याने जे गैरहजर राहतील अश्यांची पुढच्या सत्रात दोन्ही परीक्षा एकत्र घ्याव्यात असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.