मुंबई : बुधवारी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्खसंकल्प सुरुवातीला सादर केला जात होता. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलील हे बजेट सादर करण्यासाठी उपस्थित राहणार होते. पण त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळं सहआयुक्त रमेश पवार हे सभागृहात उपस्थित राहिले.


शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी सभागृहात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 2021- 22 चा वार्षिक अंदाजपत्रक शिक्षण समिती अध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात आला. मग हा अर्थसंकल्प वाचण्यासाठी रमेश पवार हे आपल्या खुर्चीवर बसले पण वाचण्याआधी त्यांना पाणी प्यायचे होते. समोर एक सॅनिटायझरची बॉटल आणि एक पाण्याची बॉटल होती. अनावधानानं यातील पाण्याची बॉटल वगळून त्यांनी चुकून सॅनिटायझरची बॉटल घेतली आणि ते प्यायले.


तिथं पालिका सहआयुक्त रमेश पवार यांच्याकडून ही चूक होताच क्षणार्धातच सदर ठिकाणी एकच तारांबळ उडाली.


'एएनआय' या वृत्तसंस्थेनं या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये पवार सॅनिटायझर प्यायल्याचं दिसत आहे. ही बाब लक्षात येताच तिथं तातडीनं त्यांना थाबंवत त्यानंतर पाणीही देण्यात आलं. या घटनेनंतर पवार काही काळासाठी त्या ठिकाणहून बाहेर निघून गेल्याचंही म्हटलं गेलं. काही कालावधीनंतर ते सभागृहात पुन्हा परतले आणि त्यांनी नियोजितय कार्यक्रम पूर्णत्वास नेला. त्याना कोणत्याही प्रकारचा त्रास न जाणवल्याची माहिती सध्या समोर येत आहे.





महापालिकेच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक विकासासाठी विशेष तरतुदी


शिक्षण विभागासाठी यंदा 2945.78 कोटींची तरतूद करण्यात आली असून तितक्याच उत्पन्नाची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी 2944.59 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावेळी त्यात 1.19 कोटींची वाढ करण्यात आली आहे. शिवाय विशेष नवे प्रकल्प आणि योजनांऐवजी महापालिका शाळांचं नवं नामकरण आणि लोगो बदलण्यावरच भर या अर्थसंकल्पात देण्यात आला आहे.