ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी ही कारवाई केली.


इक्बाल कासकर एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कासकर सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात असून गुरुवारी त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी हा प्रकार घडला. तसेच कासकरला जास्त वेळ बाहेर ठेवणे, फोनवर बोलू दिल्याचा या पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोप आहे.


उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय हालोरे, कुमार पुजारी आणि सुरज मानवार अशी करवाई करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत


न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी इक्बाल कासकरला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करीता दाखल करण्यात आले होते. मात्र, संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तो शासकीय रुग्णालयाच्या आवारात एका निळ्या रंगाच्या खाजगी गाडीत पोलीस संरक्षणात बिर्याणीवर ताव मारत असताना दिसला.

तसेच तो नातेवाईकांच्या भेटीगाठी घेत होता. याशिवाय त्याने सिगारेट ओढली हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर त्यांच्या संरक्षणातच सुरू होता. हे सर्व आटोपल्यानंतर त्याने खिशातून पैसे काढून पोलिसांना वाटप केले आणि पुन्हा तो कारागृहात परतला. हा सगळा


इक्बाल कासकर याला ठाणे पोलीस खंडणी विरोधी पथकाने खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती.