मुंबई : संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातही शाळा महाविद्यालयात ‘योग दिन’ साजरा केला जातो. मात्र दर महिन्याच्या 21 तारखेला योगासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, असं मत शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं.
विनोद तावडेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज सकाळी राज्यभरातील क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होत्या.
प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला शाळांमध्ये योग दिवस साजरा करावा आणि किमान अर्धा तास विद्यार्थ्यांना योग शिकवावा. महिन्याच्या 21 तारखेला सुट्टी असल्यास त्या तारखेच्या अगोदर किंवा नंतर योग दिवस साजरा करण्यात यावा, असं तावडेंनी सुचवलं.
योगामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्याबरोबरच आजच्या धावपळीत आवश्यक असणारी चपळता, एकाग्रता वाढण्यास मदत होते. हे विद्यार्थ्यांना समजून सांगणे आवश्यक असल्याचं तावडे म्हणाले.
‘मिशन वन मिलिअन’च्यावेळी राज्यभरात राबवण्यात आलेल्या अभियानाचे सर्व फोटो एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर योग दिनानिमित्त राज्यभरात होणाऱ्या कार्यक्रमाचे फोटो एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात यावे आणि त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार कण्यात यावं, असं आवाहन तावडेंनी केलं.
योग दिन फक्त 21 जून रोजीच साजरा करुन उद्दिष्ट साध्य होणार नाही. तरी या दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये योग महोत्सव आयोजित करणे आणि यानिमित्ताने विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी 21 जून रोजी योग दिन शाळांमध्ये कशा पद्धतीने साजरा होणार आहे, यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे याबाबतची माहिती 16 जूनपर्यंत शिक्षण आयुक्तांना द्यावी, अशा सूचनाही तावडे यांनी यावेळी केल्या.
दर महिन्याच्या 21 तारखेला शाळांमध्ये 'योग दिन' : तावडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jun 2018 09:56 PM (IST)
दर महिन्याच्या 21 तारखेला योगासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, असं मत शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -