मुंबई: राज्यासह देशाच्या राजकारणात अनेकदा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची पंतप्रधान पदी निवड होण्याबाबत चर्चा होते, मात्र पहिल्यांदाच नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना एका कार्यक्रमावेळी मुलाखतीत विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर कोणी दिली होती? या प्रश्नावर आणि पंतप्रधान होण्याच्या इच्छेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाखतीवेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केलं.


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 4 जून रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना पंतप्रधान होण्याची ऑफर दिली होती, त्यांनी ही ऑफर नाकारली होती. यासंबधीच्या प्रश्नावर उत्तर देताना, ते म्हणाले, हे माझ्या विचारसरणीशी जुळत नाही


'मला पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा नाही' 


पंतप्रधान होण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना गडकरींनी सांगितले की, अशा ऑफर देणाऱ्यांनाही त्यांनी विचारले, "तुम्हाला मला पंतप्रधान का करायचे आहे? आणि मी म्हणालो की हे माझ्या विचारसरणीशी जुळत नाही आणि माझी अशी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही." जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, पंतप्रधान होण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षातील शरद पवार किंवा सोनिया गांधी यांच्याकडून आला होता का? यावर भाष्य करण्यास गडकरींनी (Nitin Gadkari) नकार देत आपण या विषयावर काहीही बोलणार नसून लोकांना कोणत्या चर्चा करायच्या त्या ते करण्यास मोकळे असल्याचे त्यांनी सांगितले.


मोदींचे वाढते वय आणि RSS मधील त्यांची विश्वासार्हता याबाबत विचारले असता, त्यांना पंतप्रधान मोदींनंतर प्रमोशन मिळेल का? ते म्हणाले, "मी आरएसएसचा स्वयंसेवक आहे. तुम्ही मोदीजींना प्रश्न विचारू शकता, पण माझे आणि पंतप्रधान मोदींचे नाते खूप चांगले आहे."


नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, "मी काही बनण्यासाठी राजकारणात आलो नाही. कोणीही कोणाला पुढे जाऊ देत नाही, पण आज मी मनापासून बोलत आहे की मला कोणतीही अडचण नाही." पंतप्रधान होण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, "माझी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. जर मी त्याच्या लायक असेल तर मला ते मिळेल."


यश आणि आव्हानांवर गडकरी काय म्हणाले?


नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे गेली दहा वर्षे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांना त्यांच्या अनुभवानुसार जास्त मंत्रिपद मिळावेत याबाबतच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मी कधीच कोणाकडे काही मागायला गेलो नाही. माझा 5 टक्के राजकारण आणि 95 टक्के समाजसेवेवर विश्वास आहे.