मुंबई : विक्रोळीमधील कन्नमवार नगर 2 येथील उत्कर्ष शाळेसमोरील सांस्कृतिक कला भवनाच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना त्याचा काही भाग कोसळला. दुरुस्तीचे काम करणारे 7 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. मदतकार्य सुरु केल्यानंतर सर्व कामगारांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहे. त्यापैकी 3 कामगार गंभीर जखमी झाले आहेत.


हे सांस्कृतिक कला महाराष्ट्र शासनाने लोकशाहीर विठ्ठल उमप यांना दिले होते. विठ्ठल उमप या कलाभवनामध्ये गाण्याचा,संगीताचा सराव करायचे. कलाभवनाची इमारत जीर्ण झाली होती. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्तीचे काम शासनाने हाती घेतले होते. दुरुस्तीच्या कामांदरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य अद्याप सुरु आहे. जेसीबीच्या सहाय्याने ढिगाऱ्यांखाली अजून कोणी अडकले आहे का, याचा तपास घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विठ्ठल उमप यांचे पुत्र आणि गायक नंदेश उमप घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नंदेश यांनी घटनेची पाहणी केली.