मुंबई : भारतातला सर्वात मोठा रोप वे मुंबईत बांधला जाणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने त्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट शिवडी ते जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा बेटादरम्यान रोप वे सेवा सुरु करणार आहे. या प्रकल्पासाठी पोर्ट ट्रस्ट जागतिक निविदा मागवणार आहे. आज नितीन गडकरींच्या हस्ते वॉटर फ्रंटवर अनेक कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. त्यामध्ये विविध प्रकल्पांसाठीच्या निविदा कामाला सुरुवात करण्यात आली.


मुंबई ते घारापुरी येथील एलिफंटा बेटापर्यंतचे 8 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी केवळ 14 मिनिटे लागतील. सध्या हेच अंतर बोटीने पार करण्यासाठी एक तास लागतो. हा भारतातील पहिला समुद्रातील रोप वे आहे. केंद्र सरकारच्या स्थायी वित्त समितीने या रोप वेला परवानगी दिलेली आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत या रोप वेचे संपूर्ण काम होऊन ही सेवा सुरु होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.