Vikhroli Accident News: मुंबई : विक्रोळीत घडलेल्या भीषण अपघातानं मुंबई शहर पुरतं हादरून गेलं आहे. विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावरील प्रवीण हॉटेल समोर गुरूवारी रात्री साडेबाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांनी जागीच जीव गमावला. रोहित भाऊसाहेब निकम आण सिद्धार्थ राजेश ढगे अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावं आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावरुन भरधाव वेगात जात असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला, अशी माहिती मिळत आहे. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात गाडीचा पुरता चक्काचूर झाला आहे. 


रोहित भाऊसाहेब निकम आणि सिद्धार्थ राजेश ढगे दोन तरुण गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास विक्रोळी (Vikhroli) मार्गे जात होते. मध्यरात्री रोहित निकमची चारचाकी गाडी सिद्धार्थ ढगे चालवण्यासाठी घेतली. पूर्व द्रुतगती मार्गावरुन (Eastern Expressway) भरधाव वेगानं गाडी चालवत असताना सिद्धार्थचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. गाडीनं एवढ्या जोरात झाडाला धडक दिली की, गाडीचा पुरता चक्काचूर झाला.या अपघातात जखमी झालेल्या रोहित आणि सिद्धार्थला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु, तोपर्यंत फार उशीर झाला होता. काळानं घाला घातला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. एकाच विभागातील दोन तरुणांचा अश्या प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने विक्रोळी परिसरात शोककळा पसरली आहे.


नेमकं काय घडलं? 


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वद्रुतगती मार्गावर विक्रोळीजवळ कारला भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री 12.30 वाजता प्रवीण हॉटेलसमोर ही घटना घडली. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने फूट पाथावरील झाडाला जोरदार धडकली. ही धडक इतकी जोरात होती की कार द्रुतगती मार्गावर पलटी झाली. या अपघातामध्ये चालक आणि त्याच्या बाजूला बसलेला एक जण गंभीर जखमी झाले. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे दोघांची प्रकृती गंभीर होती. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोघांनाही मृत घोषीत केले. या अपघातामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातामध्ये सिद्धार्थ ढगे आणि त्याचा मित्र रोहित निकम यांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. सिद्धार्थ आणि रोहित हे जीवलग मित्र होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दोन जीवलग मित्रांच्या अशा दुर्दैवी अपघाती निधनामुळे विक्रोळी परसिरात शोककळा पसरली आहे.