मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस अपेक्षेप्रमाणे सावरकरांच्या मुद्द्यावरुन तापलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विरोधी पक्षाने मांडलेला गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळला. त्यानतंर विरोधकांनी सभागृहात निषेधाचे फलक झळकावत घोषणा दिल्या. यानंतर गौरव प्रस्तावाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. 'सामन्यात खूप, विधीमंडळात चूप' अशा घोषणा यावेळी आमदारांनी दिल्या. तसंच सावरकर यांचा गौरव करायला शिवसेनेला लाज वाटते का? असा सवालही फडणवीसांनी विचाारला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली. मग त्यांच्या गौरव ठरावाला सरकार विरोध करणार का, असा उलट प्रश्नही फडणवीसांनी सरकारला केला.
दरम्यान, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर भाजप आमदारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा ठेवली आणि त्यांना आदरांजली वाहिली. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सरकारकडून प्रतिमा ठेवण्यात आली नव्हती.
दुसरीकडे सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने या यात्रेचं आयोजन करण्यात आलं. बाबाराव चौकातून या यात्रेला सुरुवात झाली.
सावरकरांचा मुद्दा विधानसभेत गाजला!
शिदोरी मासिकावर बंदी घाला : देवेंद्र फडणवीस
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव मांडताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस संचालित 'शिदोरी' या मासिकावर बंदी घालण्याची मागणी केली. या मासिकात सावरकरांविषयी कायम आक्षेपार्ह लिखाण आणि अपशब्द वापरले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
फडणवीसच सावरकरांचा अपमान करत आहेत : जयंत पाटील
विरोधकांकडून विशेषत: देवेंद्र फडणवीस सावरकरांवरुन सत्ताधाऱ्यांविरोधात टीका करत होते. स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत असल्याचा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी 'शिदोरी' मासिकातील काही दाखले दिले होते. त्यावरुन जयंत पाटलांनी ही टीका केली.
'शिवसेना सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलीय'
सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली आहे. शिवसेनेला इतकं लाचार झालेलं कधीही पाहिलं नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली आहे, हे जनता विसरणार नाही, असंही ते म्हणाले.
...तर मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करेन : नितेश राणे
मला सावरकरांबद्दल जास्त माहिती नसेल पण सावरकरांबद्दल माहिती घेतल्यानंतर माझं मत बदललं आहे. माझ्या आधीच्या ट्वीटचा उल्लेख माझ्यावर प्रेम करणारे शिवसेनेचे नेते वारंवार करत आहे. आधीच्या ट्वीटबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले. तसंच जर मुख्यमंत्र्यांनी सावरकारांचा गौरव प्रस्ताव मांडला तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन, असं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
सावरकरांच्या भारतरत्नांमध्ये अडचण काय आली? : अजित पवार
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान नाकारता येत नाही असं म्हणत अजित पवार यांनी सर्वांचं एकमत असेल तर चर्चेला हरकत नसल्याचं म्हटलं. तसंच
सावरकर यांचे अनेक स्मृतिदिन आले. आज पहिल्यांदाच आला नाही. सावरकर हे थोर देशभक्त आहेत. त्यांना आदरांजली अर्पण करतो. सभागृहात हा प्रस्ताव मांडताना काय राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात माहित नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत पंतप्रधानांना दोन वेळा पत्र दिलं. पण मग अडचण काय आली, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
'सामन्यात खूप, विधीमंडळात चूप', सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपची घोषणाबाजी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Feb 2020 03:54 PM (IST)
स्वातंत्र्यावीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळला. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात भाजपने जोरदार घोषणाबाजी आणि फलकबाजी केली. तत्पूर्वी काँग्रेसच्या शिदोरी मासिकावर बंदी घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -