रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. परंतु सध्या ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय झाल्यावरच ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. याला कारण म्हणजे राजराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाचं वृत्तही येत आहे. येत्या काही दिवसात होणाऱ्या मेगाभरतीत उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे उदयनराजे आणि रामराजे दोघेही भाजपमध्ये गेले तर वाद पुन्हा होऊ शकतो.
रामराजे शिवसेनेत का जाऊ शकतात?
रामराजे हे विधानपरिषदेचे सभापती आहेत. त्याआधी फलटणमधून निवडणूक जिंकले आहेत. युतीमध्ये फलटण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात आहे. त्यामुळे रामराजे शिवसेनेत जाऊ शकतात.
उदयनराजे आणि रामराजेंमधला वाद जगजाहीर
सध्या दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. दोघे भाजपमध्ये गेल्यावर पुन्हा तेच वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रामराजे शिवसेनेत जाऊ शकतात. रामराजेंचे जावई राहुल नार्वेकर यांनी याआधी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली आहे. राहुल नार्वेकर यांचे आजही शिवसेनेशी संबंध चांगले आहेत.