मुंबई : समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते महंमदभाई खडस यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी रात्री निधन झाले. मृत्यूसमयी ते 83 वर्षांचे होते. त्यांचा निधनाने समाजवादी चळवळीला मोठा धक्का बसता आहे.  दफनविधी कोकणातील चिपळूण या मूळ गावी शुक्रवारी करण्यात येणार आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासून समाजवादी पक्षाचे काम सुरु केले. मराठवाडा नामांतर आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठविल्याबद्दल त्यांनी 14 महिन्यांचा कारावास भोगला होता. दलित आणि उपेक्षितांच्या हक्कांच्या चळवळीतील आंदोलनात त्यांनी सक्रिय काम केले होते. सोबतच मुस्लिम समाजातील मागास घटकांच्या कारणांचा शोध घेऊन त्यांनी सवित्सर अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला होता. हमीद दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाने हाती घेतलेल्या मुस्लिम तलाक पीडित महिलांच्या प्रश्नावर त्यांनी नेटाने बाजू मांडली होती.


उपेक्षित सफाई कामगारांच्या जीवनाचा अभ्यास करुन महंमद खडस यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण ठाकूर यांच्यासोबत 'नरकसफाईची गोष्ट' हे पुस्तक लिहले आहे. त्यात सफाई कामगारांच्या जगण्याचे भीषण वास्तव त्यांनी जगासमोर मांडले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, मुंबईतील गिरणी कामगारांच्या लढ्याला त्यांनी नेहमी सक्रिय सहभाग घेतला होता. राष्ट्र सेवा दलात ते काही काळ होते, पण युवकांना सामाजिक प्रश्नांचा ठोस कार्यक्रम द्यावा या हेतुने त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत समता आंदोलन नावाची वेगळी संघटना उभारली होती.

महंमद खडस यांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे सामाजिक लढे, आंदोलने याविषयी त्यांना कमालीची आस्था होती. 1980 च्या दशकात पुण्यातील विषमता निर्मूलन परिषदेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. मुंबईतील अपना बाजारच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. 1972 च्या दुष्काळात मराठवाड्यातून मुंबईत स्थलांतरीत झालेल्यांना त्यांनी मदत केली. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. महंमदभाई खडस यांच्या पश्चात पत्नी फाफा उर्फ फातिमा खडस, चिरंजीव पत्रकार समर खडस असा परिवार आहे.