मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. सेन्सेक्स 446 अंकांनी वाढून 45 हजार 079 वर बंद झाला. आज सेन्सेक्स 45 हजार 148 पर्यंत पोहोचला होता, जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. निफ्टी 125 अंकांच्या तेजीसह 13 हजार 258 वर बंद झाली आहे.
टॉप गेनर्स आणि लूजर्स
सेन्सेक्समध्ये ICICI बँक, अल्ट्राटेक सिमेंट, सनफार्मा, भारती एअरटेल आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर रिलायन्स, बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एचसीएल या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक खाली आहे. ICICI बँकेचे शेअर्स 4.2 टक्क्यांनी वधारले तर रिलायन्सचे शेअर्स 0.86 टक्क्यांनी घसरले.
केवळ नोव्हेंबर महिन्यातच इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये 46 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. आता त्याचे शेअर्स 857.65 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. मागील महिन्यात 30 ऑक्टोबर रोजी शेअरची किंमत 585.60 रुपये होती.
आयआरसीटीसीचे शेअर 14 टक्क्यांनी वाढले
आज आयआरसीटीसीचे शेअर्स 14.51 टक्क्यांनी वधारले. स्पाइस जेटच्या शेअरमध्येही दहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अदानी पॉवरने 10 टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र 8.8 टक्के आणि मॅक्स हेल्थकेअरमध्ये 8.8 टक्के वाढ झाली आहे.
जगभरातील तेजीचे शेअर बाजार
कोरोना लसविषयी सकारात्मक बातमी आणि अमेरिकेत आणखी एक मदत पॅकेज मिळण्याची अपेक्षा यामुळे शेअर बाजार उसळी घेत आहे. सध्या जगातील सर्व शेअर बाजारामध्ये तेजी दिसून येत आहे. या आठवड्यात सर्व क्षेत्रांतील शेअर्समध्ये वाढ दिसून आली. निफ्टी आणि निफ्टी बँक सलग पाचव्या आठवड्यात तेजीसह बंद झाला आहे. निफ्टी स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्येही सलग पाचव्या आठवड्यात वाढ झाली.