मुंबई : दुरुस्तीच्या कामांसाठी बंद करण्यात आलेला मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा खाडी पूल आजपासून खुला करण्यात आला आहे. वर्सोवा पुलावरील दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा पूल खुला करण्यात आला.
दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवसांपासून हायवे अथॉरिटीने वर्सोवा खाडी पूल अवजड वाहनांसाठी बंद केला होता. वर्सोवा पूलाच्या सुरत-मुंबई लेनचं काम सुरु होतं. त्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणारी अवजड वाहतूक भिवंडीमार्गे वळवण्यात आली होती. तसेच हलक्या वाहनांसाठी या पुलाची एक लेन सुरु होती. तसेच या कालावधीत इतर वाहनांसाठीही पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले होते.
या दुरुस्ती दरम्यान भिवंडी, ठाणे, वसई विरार येथे हायवेवर प्रचंड वाहतूकीचा सामना वाहनचालकांना करावा लागत होता. या पुलाचं काम करण्याची मुदत 25 डिसेंबर होती. हायेव अथॉरिटीने आपलं काम निर्धारीत वेळेच्या आत पुर्ण केलं आहे.