मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांची तब्येत शुक्रवारी अचानक बिघडल्याने त्यांना माहीम येथील रहेजा फोर्टीस रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. न्यूज चॅनल्सवरील डिबेट शोमध्येच त्यांना त्रास जाणवू लागला होता. अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रणजित सावरकर यांच्यावर सध्या फोर्टीस रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. शुक्रवारी संध्याकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित छापलेल्या 'वीर सावरकर, कितने वीर?' या पुस्तकावरुन वाद सुरु झाला आहे. काँग्रेस सेवादलाच्या पुस्तिकेत वीर सावरकरांचे आणि नथुराम गोडसे यांचे समलैंगिक संबंध होते, असा वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. याच मजकुरावरुन सध्या वाद सुरु झाला आहे.
रणजित सावरकर याच पुस्तकावरुन संतप्त झाले असून ते आपले गाऱ्हाणे घेऊन आज मंत्रालयात दाखल झाले होते. या पुस्तकावर तातडीने बंदी आणावी अशी मागणी घेऊन रणजित सावरकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. मात्र मात्र, व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही. 50 मिनिटे वाट पाहून ते मंत्रालयातून बाहेर पडले. रणजित सावरकर यांना ही बाब अपमानास्पद वाटली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रणजित सावरकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांकडे भेटायला वेळ नाही, हा सावरकरांचा अपमान, रणजित सावरकरांचा आरोप
उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याने रणजित सावरकरांनी त्यांचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडे सोपवले. रणजित सावरकरांनी संबंधित पुस्तकावर बंदी घालून काँग्रेस सेवा दलावरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. 'वीर सावरकर कितने वीर' असे या पुस्तकाचे नाव असून या पुस्तकात 'फ्रीडम अॅट नाईट' या पुस्तकातल्या लिखाणाचा दाखला देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन राजकारण सुरु आहे. भाजप आणि काँग्रेस यावरुन आमने-सामने आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन रणजित सावरकर नाराज असून ते मानसिक तणावात आहेत. याच कारणावरुन त्यांची तब्येत काल अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.