मुंबई : काँग्रेस सेवा दलाच्या भोपाळमधील कार्यक्रमादरम्यान लोकांमध्ये वाटण्यात आलेल्या पुस्तकावरुन मोठा वाद उफाळून आला आहे. या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर विनायकर दामोदर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला आहे. त्यास आता सावरकरप्रेमींकडून विरोध होऊ लागला आहे. या पुस्तकावर बंदी घाला, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केली आहे.


काँग्रेस सेवादलाच्या पुस्तिकेत वीर सावरकरांचे आणि नथुराम गोडसे यांचे समलैंगिक संबंध होते, असा वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यावरुन रणजित सावरकर संतप्त झाले असून ते आपले गाऱ्हाणे घेऊन आज मंत्रालयात दाखल झाले होते. मात्र, व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही. 50 मिनिटे वाट पाहून ते मंत्रालयातून बाहेर पडले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रणजित सावरकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला.


माध्यमांशी बोलताना रणजित सावरकर म्हणाले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो होतो. मी त्यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली होती. परंतु ते मला भेटले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानाबाबत बोलण्यासाठी मी आलो होतो, परंतु उद्धव ठाकरेंकडे भेटण्यासाठी एक मिनिटही नाही. मुख्यमंत्र्यांच्या या अशा वागण्याने मी निराश झालो आहे. हा सावरकरांचा अपमान आहे.


उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याने रणजित सावरकरांनी त्यांचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडे सोपवले. रणजित सावरकरांनी संबंधित पुस्तकावर बंदी घालून काँग्रेस सेवा दलावरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. 'वीर सावरकर कितने वीर' असे या पुस्तकाचे नाव असून या पुस्तकात 'फ्रीडम अॅट नाईट' या पुस्तकातल्या लिखाणाचा दाखला देण्यात आला आहे.





काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत ही पुस्तिका प्रसारित करुन विकृत मानसिकतेचं दर्शन घडवलं आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, या पुस्तकावर तत्काळ बंदीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या पुस्तकाचा निषेध केला आहे.





फालतू पुस्तकानं सावरकरांवरील श्रद्धा कमी होणार नाही : संजय राऊत | Mumbai |ABP Majha