वसईत चिंचोटी धबधब्यावर पिकनिकला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2018 11:00 AM (IST)
सात मित्रांसोबत वसईतील चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी गेलेल्या कांदिवलीच्या तरुणाचा वसईतील चिंचोटी धबधब्यावर बुडून मृत्यू झाला
वसई : पावसाळ्यात धबधब्यांचा आनंद लुटताना दाखवलेली निष्काळजी तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. वसईतील चिंचोटी धबधब्यावर 18 वर्षांच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुनीलकुमार हरिश्चंद्र गुप्ताचा मृत्यू झाला असून तो मुंबईतील कांदिवलीमध्ये ठाकूर व्हिलेज परिसरातील राहत होता. सुनीलकुमार शुक्रवारी आपल्या सात मित्रांसोबत वसईतील चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी आला होता. ग्रुपसोबत पोहत असताना वाहत्या धबधब्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला होता. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुनीलकुमारचा मृतदेह शोधला. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यानिमित्ताने पावसाचा आनंद लुटताना जीवाची काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.