मुंबई : राज्यातील प्लास्टिकबंदीवरुन पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वाकयुद्ध सुरुच आहे. राज ठाकरेंचा पक्ष संपला आहे. व्यापाऱ्यांकडून सुपारी घेऊन त्यांनी शिवसेनेची बदनामी सुरु केल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. मुंबईतील घाटकोपर येथील असल्फा विभागात शिवसेनेतर्फे कापडी पिशव्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रामदास कदम यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला.


"राज ठाकरे नऊ महिने झोपले होते का? त्यांचा पक्ष संपला आहे. व्यापाऱ्यांकडून सुपारी घेऊन शिवसेनेची बदनामी सुरु केली आहे. राज ठाकरे हे काळ्या मांजरासारखे निर्णयाला आडवे येत आहेत. इंग्लड सरकारकडूनही या निर्णयाला फॉलो केलं जात आहे," असं रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम पुढे म्हणाले की, "राज ठाकरे चुकलेले आहेत, असं मला वाटतं. या निर्णयाचं त्यांनी स्वागत करायला हवं होतं. सबंध जगाने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला आहे. जागतिक निर्णय आहे. आपल्या देशाला त्याचं यजमानपद मिळालं आहे. 17 राज्यात जरी प्लास्टिकबंदी असली तरी जागतिक निर्णय झाल्यानंतर सुरुवात महाराष्ट्राने केली आहे. याचं त्यांनी स्वागत करायला हवं होतं. सबंध जग नालायक आहे आणि मी फक्त एकटा लायक आहे, असं म्हणून चालणार नाही. आवश्यक बाब आहे त्याचं स्वागत करायला हवं, अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा होती."

पाहा व्हिडीओ