मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील महापूर ओसरल्यानंतर कोल्हापूर सांगलीतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. परंतु या पुरामुळे लोकांचं कधीही भरुन न निघणारं नुकसान झालं आहे. लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे इथल्या लोकांना मदतीची गरज आहे. सांगली, कोल्हापूरकरांसाठी मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरातून सामान्यांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.


पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य, अन्नधान्य गोळा करण्यासाठी नालासोपाऱ्यात एका सामाजिक संस्थेने स्टॉल लावला होता. परंतु पालिकेने या स्टॉलवर कारवाई करत स्टॉल तिथून हटवला आहे. पालिकेच्या या असंवेदनशीलतेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. वसई-विरार महापालिका अनधिकृत फेलीवाल्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लावलेल्या सामाजिक संस्थेच्या स्टॉलवर कारवाई करते. त्यामुळे पालिका प्रशासनावर टीका केली जात आहे.

नालासोपारा पश्चिमेकडे पंचमुखी हनुमान मंदिरासमोर नर्मदेश्वर सेवा संघ या सामाजिक संस्थेने पूरग्रस्तांसाठी सामान्य जनतेकडून अन्न धान्याच्या स्वरुपात मदत जमवण्याकरीता स्टॉल लावला होता. मात्र सकाळी 11.30 च्या सुमारास पालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्या स्टॉलवर कारवाई केली.

या कारवाईमुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. तसेच पालिकेच्या कारवाईविरोधात निषेधाचे बॅनरही लावले. नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं, फेरीवाले, स्टॉल्स आहेत. परंतु पालिका त्यावर कारवाई करताना दिसत नाही, असा आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.