पालघर : पालघरमध्ये वाडा पिवळी बसला शिरीषपाडा-शहापूर रोडवर अपघात झाला. या अपघातात 64 जण जखमी झाले असून त्यात 50 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी पाच विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

ही बस सकाळी साडेसहा वाजता पिवळीवरुन वाड्याकडे निघाली होती. बसमध्ये वाडा इथे शिक्षण घेणारे जवळपास 60 विद्यार्थी आणि काही कामगार प्रवास करत होते. चालक भरधाव वेगाने गाडी चालवत होता. बस जांभूळपाडा इथे पोहोचताच चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. बस स्पीड ब्रेकरवर आदळून झाडाला धडकली आणि रस्त्याच्या कडेला गेली.



या अपघातात काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला, पायाला, कमरेला, हाताला मार लागला असून गंभीर जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोन गंभीर जखमी कामगारांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला.

दरम्यान, पोलिस आणि एसटी महामंडळ या घटनेचा तपास करत असून आरोपी चालकावर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तर जखमींच्या उपचारांसाठी महामंडळाकडून प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.