वसई : वसईमध्ये सख्ख्या मुलाने आपल्या वृद्ध आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारुचं व्यसन सोडण्यास सांगणाऱ्या आईला लेकाने जीवे मारलं.
वसईच्या वाघोबा मंदिराजवळच्या टिवरी गावातील खराडपाडा भागात ही घटना घडली.
आरोपी नरेश महाली याला दारुचं व्यसन होतं. त्यानं दारु पिऊन 10 तारखेला दुपारच्या सुमारास पत्नीशी भांडण केलं. मुलांना आणि पत्नीला मारहाण केली होती. त्यामुळे पत्नी मुलांना घेऊन मावशीकडे गेली होती.
घरी 70 वर्षाच्या वृध्द सीताबाई महाली होत्या. 'तू नेहमी दारु पिऊन बायको-मुलांना मारहाण करुन त्रास का देतोस? आम्हाला सुखाने जगू दे' असं म्हणत त्यांनी लेकाला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी नरेशने रागाच्या भरात घरातील कोयत्याने आईच्या गळ्यावर वार केले.
सकाळी घरातील माणसं आल्यावर सीताबाईंना रक्ताच्या थारोळ्यात बघून पोलिसांना बोलावून घेतलं. वालीव पोलीसांनी आरोपी नरेशला अटक केली आहे.