वसई : वसईत चामुंडा ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 35 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहेत. विशेष म्हणजे दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरांनी ऐवज लांबवला.



नायगाव पूर्वेकडील वाकीपाडा परिसरात चामुंडा ज्वेलर्समध्ये ही चोरी झाली. सीसीटीव्हीत एक चोरटा कैद झाला आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात वालिव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झालं आहे.


मुख्य नाक्यावर असलेलं चामुंडा ज्वेलर्स हे दहा दिवसांपूर्वीच सुरु झालं होतं. दुपारी दोन ते चारच्या सुमारास ज्वेलर्स मालक आपले दुकान बंद ठेवून जेवण्यासाठी घरी गेला असता. त्याची संधी साधून पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी बाजुच्या दुकानातील भिंतीला भोक पाडून आत प्रवेश केला.


सतराशे ग्रॅम सोनं आणि 16 किलो चांदीचे दागिने घेवुन चोरटे फरार झाले असल्याचा दावा दुकान मालक आणि ज्वेलर्स असोशिएशनने केला आहे. एकूण 50 लाख रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारल्याचं म्हटलं जातं. पोलिसांनी मात्र 35 लाखांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती दिली आहे.


दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडी झाल्याने ज्वेलर्स मालकात मोठी दहशत पसरली आहे. एक चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असला तरी दोन ते तीन चोर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भर रस्त्यावरील ज्वेलर्स फोडुन चोरटे फरार होण्यात यशस्वी झाल्याने वसईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.