वसई : दरवर्षी अग्निशमन दलाचे कित्येक कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालतात, मात्र मृत्यूनंतर त्यांना शहीद म्हणून घोषित केले जात नाही. मृत्यूनंतर विरारच्या इवलेकर कुटुंबालाही अनेकांकडून आश्वासने मिळाली, पत्नीला सरकारी नोकरीही मिळाली. पण पतीला शहीदाचा दर्जा न मिळाल्याने त्यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं आहे.

कर्तव्य समजून एका महिलेला आगीतून वाचवताना ती व्यक्ती शहीद झाली, मग त्याला शहीद असे नाव का मिळाले नाही, याचे उत्तर नितीन इवलेकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून विचारले आहे.

विरारचे नितीन भागुराम इवलेकर बोरीवलीच्या अग्निशमन केंद्रामध्ये कार्यरत होते. 18 जुलै 2014 रोजी अंधेरी पश्चिमच्या लोटस बिझनेसच्या इमारतीत लागलेल्या आगीत जनतेला सुरक्षित बाहेर काढताना त्यांनी स्वतःचा जीव गमावला. नितीन यांच्या पश्चात
त्यांची पत्नी शुभांगी इवलेकर त्यांच्या दोन मुलींचा सांभाळ करुन घर चालवते.

नितीनच्या मृत्यूनंतर महापालिकेकडून कुटुंबाला मदत मिळाली, परंतु जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर राहिलेल्याला शहीदचा दर्जा दिला नाही. म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करत आगीतून महिलेला सुरक्षित बाहेर काढताना स्वतःचा जीव गमावलेल्या माझ्या पतीलाही शहीद म्हणून घोषित करावे, अशी मागणी पत्नीने राज्य सरकारकडे केली आहे.