चोरीसाठी दिल्लीहून विमान प्रवास, वसईत 16 घरफोड्या
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2016 08:13 PM (IST)
वसई : दिल्लीच्या संगमविहार परिसरात व्यावसायिक म्हणून वावरणाऱ्या डेव्हिड मोहन वाल्मिकी या अट्टल दरोडेखोराला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा घरफोड्या चोरीसाठी विमानाने प्रवास करुन येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डेव्हिड उर्फ करण असं नाव असलेला हा दरोडेखोर साथीदाराच्या मदतीने केवळ दिवसा घरफोडी करायचा. चोरी करण्यासाठी तो खास दिल्लीहून मुंबईला विमानानं प्रवास करायचा. 2010 ते 2012 या काळात त्यानं केलेल्या 16 घरफोड्यांचा तपास लागला आहे. तसंच साडेसोळा लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. डेव्हिड आणि त्याच्या साथीदाराला वसई न्यायालयानं चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून हस्तगत केलेले दागिने चोरी झालेल्या कुटुंबियांना परत देण्यात आले आहेत.