वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई परिसरात एका दाम्पत्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला. यामध्ये पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलेल्या या दाम्पत्याचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वर्सोवा ब्रिजजवळ 29 मे रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या हल्ल्यामागचा सूत्रधार पोलिसांना अद्याप सापडलेला नाही.

41 वर्षीय अविनाश विरेंद्रकुमार तिवारी आणि 38 वर्षीय सीमा विश्वकर्मा-तिवारी हे दोघे दहिसर पश्चिममधील कंदारापाडा भागातील दिशा अपार्टमेंटचे रहिवासी आहेत. बुधवारी दोघं जेवण्यासाठी बाईकने वसईतील 'किनारा हॉटेल'ला गेले होते. जेवणानंतर रात्री दोन वाजताच्या सुमारास वर्सोवा ब्रिजजवळ रस्ता ओलांडण्यासाठी ते उभे होते. वाहनांच्या रहदारीमुळे त्यांना रस्ता क्रॉस करायला वेळ लागत होता, इतक्यात एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर अॅसिड फेकलं.



अचानक धूर झाल्याने या दोघांना काहीच दिसेनासे झालं. हीच संधी साधून हल्लेखोर आरोपी तिथून फरार झाला. दोघांनी समोरच असलेल्या पेट्रोल पंपावर धाव घेतली. तिथल्या कर्मचाऱ्यांनी दोघांच्या अंगावर पाणी टाकलं आणि रुग्णवाहिका बोलावून त्यांना कांदिवली येथील जनशताब्दी रुग्णालयात पाठवलं.

अविनाश तिवारी यांच्या तोंडात, नाकात, डोळ्यात अॅसिड गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. तर त्यांची पत्नी सीमा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वालीव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या तपासासाठी तीन पथकं पोलिसांनी तयार केली आहेत. हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सीमा आणि अविनाश हे सुरुवातीला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झाल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. आरोपीला पकडून लवकर या घटनेचा उलगडा करु, असं पोलिसांनी सांगितलं आहे.