वसई : रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधून आपलं रक्षण करण्याचं वचन घेतलं, मात्र अवघ्या 24 तासात हाच भाऊ तिच्या जीवावर उठला. बहीण मोबाईलवर जास्त वेळ बोलत असल्याच्या रागातून सख्ख्या भावाने तिची गळा आवळून हत्या केली. मुंबईजवळच्या वसईत ही घटना उघडकीस आली आहे.


वसईच्या वालीव हद्दीतील पाळणापाडामधील दुमंडा चाळीत बहीण-भावाच्या नात्याला रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी गालबोट लागलं. मयत तरुणीला चार ते पाच महिन्यांपूर्वी नवीन मोबाईल घेऊन देण्यात आला होता. त्यामुळे मोबाईलविषयी तिच्या मनात कुतूहल होतं. नव्या मित्रांसोबत ती फोनवर बराच वेळ गप्पा मारत असे.

हत्येच्या दिवशी वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, तर आईसुद्धा घरी नव्हती. खाजगी कंपनीत कार्यरत असलेला मोठा भाऊ ऑफिसला गेला होता. हीच संधी साधत राहत्या घरी दुपारी ओढणीच्या सहाय्याने भावाने तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली.

कोणाला संशय येऊ नये म्हणून, आरोपी भावानेच पोलिसांना बोलावून घेतलं आणि हत्येची माहिती दिली. पोलिसांना सुरुवातीला कुटुंबातील व्यक्तींवर संशय नव्हता, मात्र तपासाची चक्रं फिरताच अल्पवयीन भाऊ समोर आला. अखेर चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला.

वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी भावाला ताब्यात घेतलं. अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.