मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांसाठी शिवसेनेने 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी महापौर शुभा राऊळ, नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा आहे.
येत्या गणेशोत्सावाच्या आधी शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणार आहे. शिवसेनेच्या राज्यभरातील 18 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकांसाठी पक्षबांधणी आणि रणनीतीसाठी शिवसेना भवनात कार्यकर्त्यांची बैठक
बोलावली होती. या बैठकीत दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं.
मुंबईतील भाजप खासदारांविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी शिवसेनेतून अनेक नावं पुढे येत आहेत. मुंबईत एकूण सहा खासदार असून तीन खासदार शिवसेनेचे आहेत तर तीन खासदार भाजपचे आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, उत्तर पश्चिम मुंबईतून गजानान कीर्तीकर यांना पुन्हा संधी मिळू शकते.
कोणाकोणाच्या नावाची चर्चा ?
उत्तर पूर्व मुंबईत भाजप खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा आहे.
उत्तर मुंबईत भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची नावं समोर येत आहेत.
ईशान्य पूर्व मुंबईत भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात मनसेतून आलेले शिशिर शिंदे आणि निलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा आहे.