वसई : वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रेल्वे पूल आज (रविवारी) मध्यरात्री बारा वाजल्यापासून डागडुजीसाठी बंद केला जाणार आहे. 38 वर्ष जुना असलेला पूल वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. या पुलाच्या शेजारील नवीन पुलावरुन वाहतूक सुरु राहणार आहे.

वसईच्या माणिकपूर पोलिसांनी याबाबत रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वसई-विरार महानगरपालिका यांना सुरक्षेसंदर्भात उपाय योजण्याचे निर्देश दिले होते. अंधेरीतील पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि तात्काळ या पुलाची डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुलाच्या शेजारी असलेल्या नवीन पुलावरुन वाहतूक सुरु रहाणार आहे.
घाटकोपरमध्ये ब्रिज झुकला, खबरदारीसाठी वाहतूक बंद

वसईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा सर्वात जुना पुल आहे. 1981 साली हा पूल बांधण्यात आला होता. या पुलावरुन गेली 38 वर्षे दोन्ही बाजूची अवजड वाहनांसह छोट्या-मोठ्या वाहनांची वाहतूक होत होती.

दोन वर्षांपूर्वी बाजूला दुसरा पूल बांधल्याने त्याच्यावरची वाहतूक एकमार्गी करण्यात आली होती. पुलाचे संरक्षक कठडे पूर्णपणे जर्जर झाले आहेत. याच कठड्याच्या आतमधून अनेक पाईपलाईनही गेल्या आहेत. पाईपलाईनमधील पाणी पुलावरच झिरपत असतं, त्यामुळे त्या ठिकाणी पाणी मुरुन पुलाच्या पिलरला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुलाचे दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे हे पूर्णपणे जर्जर झाले आहेत. त्यांना थोडासाही वाहनांचा धक्का लागला तर ते खाली पडून मोठा अपघात होऊ शकत होता.