वसई : वडिलांच्या सांगण्यावरुन पादचारी पुलाऐवजी मालगाडीखालून ट्रॅक ओलांडणं मुलाच्या जीवावर बेतलं आहे. मालगाडीखाली चिरडून दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वसईत घडली आहे.


विरारमध्ये वडिलांसोबत सुट्टी घालवल्यानंतर शाजू कुटुंब केरळात परतत असताना हा अपघात घडला. जड सामान असल्यामुळे वसई स्टेशनवर मालगाडीखालून जाण्याचा पितापुत्राने निवडलेला शॉर्टकटच लेकाच्या जीवावर बेतला.

ऑस्टिन शाजू हा 15 वर्षांचा विद्यार्थी थ्रिसूरला जाण्यासाठी आई आणि धाकट्या बहिणीसोबत ट्रेन पकडणार होता. ऑस्टिनचे वडील शाजू अँथनी हे विरारमध्ये एका खाजगी बँकेत नोकरी करतात. वडिलांबरोबर सुट्ट्या घालवल्यानंतर शाजू यांची पत्नी दोन्ही मुलांसोबत केरळला परत जात होती.

शाजू कुटुंब आधी विरारहून वसईला लोकलने आलं. वसई स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर सर्व जण उतरले. अँथनी यांनी पत्नी आणि मुलीला पादचारी पुलाने सात क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर जायला सांगितलं. त्याच प्लॅटफॉर्मवर केरळला जाणारी ट्रेन येणार होती.

अँथनी आणि शाजू यांनी पुलाऐवजी ट्रॅक ओलांडून जाण्याचा मार्ग निवडला. जड बॅगांसह बापलेक रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्याचवेळी पाच आणि सहा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्म दरम्यान मालगाडी थांबली होती. त्यामुळे मालगाडीखालून जाण्याचं त्यांनी ठरवलं.

ऑस्टिन मालगाडीखाली बसला आणि अँथनी यांनी त्याला सामान पास करायला सुरुवात केली. इतक्यात मालगाडी सुरु झाली. ऑस्टिनला याची कल्पना नसल्याने तो चाकाखाली चिरडला गेला. आपल्या लेकाला बाहेर खेचण्याच्या प्रयत्नात अँथनींच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली.

लोकांनी आरडाओरड केल्याने मालगाडी थांबवण्यात आली. त्यानंतर ऑस्टिनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. धक्कादायक म्हणजे हा प्रकार घडला तेव्हा ऑस्टिनची आई आणि बहिण प्लॅटफॉर्मवर दोघांची वाट पाहत उभ्या होत्या. त्यांना सुरुवातीला या अपघाताची कल्पनाही नव्हती.

वर्षभरापूर्वीच अँथनी यांची बदली विरार ब्रँचला झाली होती. त्यांचं कुटुंब पहिल्यांदाच मुंबईला आलं होतं. पुढील काही दिवसात ऑस्टिनचा दहावीचा निकाल लागणार होता.

वसई स्टेशनवर अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून पादचारी पुलाचा वापर करण्याऐवजी मालगाडीखालून जाण्याचा प्रयत्न करतात. या स्टेशनवर मालगाड्या बराच वेळ थांबून असतात, मात्र त्या सुटण्यापूर्वी कुठलाही सिग्नल दिला जात नाही, असं वसई स्थानकातून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं.