ठाणे : ठाण्यातील रिक्षाचालक आजपासून संपावर आहेत. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समितीने संपाची हाक दिली आहे.
पालिका आणि रिक्षाचालकांच्या वादात प्रवाशांना नाहक त्रास होणार आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांनी पुकारलेल्या या संपामुळे ठाणेकरांना रिक्षाला पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाताना प्रवाशांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
रिक्षा बंद ठेवून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. रिक्षा चालकांबरोबरच फेरीवालेही संपावर जाणार असल्याचं फेरीवाला संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
पालिका आयुक्तांनी ठाण्यातील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर गेल्या दोन आठवड्यांपासून कारवाई सुरु केली आहे. 11 मे रोजी गावदेवी आणि स्टेशन परिसरात झालेल्या कारवाईच्यावेळी रिक्षा युनियनचे नेते राजू सावंत यांच्यासह काही रिक्षाचालकांना मारहाण झाल्याचा आरोप आहे.