मुंबई : मुंबईहून गुजरात किंवा दिल्लीला बाय रोड जायचा विचार करत असाल तर तुम्हाला आजपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. कारण मुंबईला गुजरातशी जोडणारा वर्सोवा पूल आजपासून पुढील चार दिवस दुरुस्तीच्या कामांसाठी पूर्ण बंद असणार आहे.
या पुलाला तडे गेल्याचं काही महिन्यांपूर्वी निदर्शनास आल्यानंतरही सप्टेंबरपासून वाहतूक सुरू होती. त्यामुळे आता पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून 17 मे पर्यंत म्हणजेच 4 दिवसांत पुलावरील पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे.
याचा परिणाम वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेरील दहिसर चेकनाक्याजवळ होताना दिसेल. कारण सध्या सुट्टीचे दिवस आहेत आणि मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
डिसेंबरमध्ये यापूर्वीही या पुलाचं काम केलं होतं. मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. डिसेंबरमध्येही वाहतूक कोंडीचा त्रास झाला होता. अजूनही काम चालूच आहे. जुना पूल बंद करण्यात आला असला तरी बाजुच्या नवीन पुलावरुन वाहतूक चालू राहिल.