वर्सोवा (मुंबई) : वर्सोवा ब्रिज बंद झाल्याचा फटका जसा सामान्यांना बसतो आहे, तसाच तो सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनाही बसतो आहे. वसईतील कामण, चिंचोटी आणि पोमण परिसरात अनेक स्टुडिओ आहेत. नामवंत मालिकांचं या स्टुडिओत शूटिंग सुरु आहे. पण वाहतुक कोंडीमुळे कलाकार आणि कामगार वेळेवर पोहचू शकत नसल्यामुळे कलाकारांनी शूटिंगकडे पाठ फिरवली आहे.


गेल्या आठ महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली वर्सोवा पुलावर वाहतूक कोंडी होते आहे. कालपासून तर जुना पूलही वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लवकर या वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशी मागणी कलाकारांनी केली आहे.

वसई परिसरातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत चिंचोटी, कामण, परिसरात मालिका आणि सिनेमांटे स्टुडीओ आहेत. या स्टुडीओंमध्ये सध्या भाभीजी घरपे है, गंगा, रुद्र के रक्षक, महाबली हनुमान, देवंशी, राजारांनी यासह अन्य मालिकांची शूटिंग सुरु आहे. या शूटिंगसाठी मुंबई, ठाणे, कल्याण, मिरारोड या परिसरातील मोठ-मोठे कलाकार आणि बॅकस्टेज कामगार मंडळी शूटींगसाठी येतात.

मागील आठ महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली वर्सोवा पुलावर वाहतुक कोंडी होत आहे. रविवारपासून तर जुना पुल हा वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मालिका आणि सिनेमांच्या शूटिंगसाठी येणाऱ्या कलाकारांना पुलावरील वाहतूक कोंडीतच तासन् तास अडकून पडावं लागत असल्यामुळे त्यांना वेळेवर शूटिंगसाठी जाता येत नाही. शूटिंगवरुन सुटले तर वेळेवर घरी पोहचता येत नाही.